अलीकडच्या अनेक गुन्हेगारी प्रकारात वाढ झाली आहे. खून मारामारी तसेच फसवणुकीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तर आहेच त्याचबरोबर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. सध्या लाचलुचपतीच्या जाळ्यात अनेक अधिकारी रंगेहाथ पकडले देखील जात आहेत. असाच प्रकार हातकणंगले तालुक्यात उघडकीस आलेला आहे. हातकणंगले तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडील खासगी कॉम्प्युटर ऑपरेटर सुभाष मधुकर घुणके (वय 34, रा. घुणके मळा, यळगूड) व त्याचा सहकारी शैलेंद्र महादेव डोईफोडे (22, रा.सणगर गल्ली, पेठवडगाव) या दोघांना अडीच हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी झाली.
शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेत वरिष्ठांना सांगून नाव समाविष्ट केले आहे, असे सांगून संशयित घुणके याने तक्रारदाराकडे 4 हजार रुपयांची मागणी केली होती. या रकमेत कोणतीच तडजोड होणार नसल्याचे घुणके याने सांगितले होते. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. शुक्रवारी दुपारी येथील तहसील कार्यालय आवारात लाचलुचपत विभागाने सापळा रचला.
यावेळी साक्षीदारांच्या समक्ष सुभाष घुणके व शैलेंद्र डोईफोडे याला 2,500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. संशयितांच्या विरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, प्रकाश भंडारे, विकास माने, संदीप काशीद, सचिन पाटील, उदय पाटील, प्रशांत दावणे यांनी केली.