सध्या अनेक भागात विकास कामांना सुरुवात झालेली आहे. तसेच निधी देखील मंजूर केले जात आहेत. आष्टा शहरातील सोमलिंग तलावाचे कृत्रिम स्वरूपाचे सुशोभिकरण त्वरित थांबवावे, या मागणीसाठी बहुजन समता पार्टीने आष्टा पालिकेसमोर डमरु आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला आष्टा शहरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेते मंडळींनी जाहीर पाठिंबा दिला. आष्टा पालिकेबाहेर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विजय दणाणे म्हणाले, सदरचे सुशोभीकरण हे पर्यावरणपूरक आणि त्याचे निकष न पाळता केले जात आहे.
या सोमलिंग तलावाला ऐतिहासिक वारसा असल्याने या तलावाच्या भोवती असणारी हिरवीगार गर्द दाट झाडी ही तोडण्यात आली. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल नाहीसा झाल्याने पर्यावरण प्रेमी नाराज आहेत. प्रा. दिलीप कुरणे म्हणाले, सोमलिंग तलाव सुशोभीकरणाची योजना कर्ज काढून करण्यात येत आहे. याची नागरिकांना समज नाही. कृत्रिम स्वरूपाच्या या सुशोभीकरणाचा किती फायदा होईल याचा कोणताही अंदाज नसल्याने सुशोभीकरणासाठी काढलेल्या कर्जाचा बोजा नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
घरपट्टी, पाणीपट्टी असेल अन्य प्रकारच्या मागणीतून हा कर्जाचा बोजा आष्टा शहरातील नागरिकांच्याकडून वसूल केला जाणारा असल्याचा आम्ही दावा करत आहे. धोरणातील निकष बाजूला ठेवून या सुशोभीकरणाचा उपक्रम चुकीचा असून आम्ही शिवसेना शिंदे गट व बहुजन समता पार्टीच्यावतीने विरोध करत आहे. त्यामधील मुरूमआणि मातीचा उपसा ठेकेदारांच्याकडून बेकायदेशीर होत असल्याचेही दिसून येत आहे.