अनेक भागात मोकाट जनावरे फिरत असतात. त्याचा नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलेला आहे. याचा अनेकांना चावा होऊन आरोग्यावर परिणाम देखील झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अशाच मोकाट जनावरांचा वावर सध्या सांगोल्यात वाढल्याचे चित्र आहे. सांगोला शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढत असताना, प्रशासन याकडे गांभीर्याने घेत नसल्याने शहरवासीयांमधून नाराजीचा सूर आहे.
यापूर्वी मोकाट जनावरांमुळे अपघातात मयत झाल्याची घटना घडली आहे. आजही सदरच्या घटना घडत असून, मोकाट जनावरांचा रस्त्यावरील वावर वाढला आहे. व्यापाऱ्यांचे ही नुकसान होत आहे. शहरातील प्रमुख मार्गावर मोकाट जनावरे बसतात यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याच्या ही घटना घडल्या आहेत. अनेकदा जनावरे अंगावर येत असल्याचेही सांगितले जात आहे. अशा एक ना अनेक घटना घडत असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे.
शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सांगोला मिरज रोडवरील रेल्वे ब्रिज खाली रस्त्याच्या मध्यभागी दोन मोकाट जनावरांच्या टक्कर लागल्याने वाहतूक ठप्प झाली. दरम्यान नागरिकांनी जनावरांना हुसकून लावण्याचा प्रयत्न केला परंतु मोकाट जनावरांच्या टकरा उशिरापर्यंत सुरू राहिल्यामुळे उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा उभ्या होत्या. नागरिकांनी मोठे प्रयत्न केल्यानंतर सदरची जनावरे ब्रिज बाहेर निघाली. आणि पूर्वत वाहतूक सुरळीत सुरू झाली. परंतु नगरपालिका प्रशासन या मोकाट जनावरांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का अशी चर्चा या निमित्ताने केली जात होती.
