लोकसभा विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलतानाचे चित्र दिसून आहे. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात वादाचे तुफान उठले आहे. संघटनात्मक कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तीला संधी द्यावी, असे सांगून प्रदेशाध्यक्ष बदलाची अप्रत्यक्ष मागणी करत रोहित पवार यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात तलवार उपसली आहे, तर रोहित पवार यांचा जयंत पाटील यांना विरोध हे कसे शक्य आहे, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी पाटील यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतच जयंत पाटील यांना पाठिंबा आणि विरोधावरून दोन गट पडले आहेत. पक्षाच्या बैठकीतच तरुण आणि महिलांना संधी देणार असे सांगून शरद पवार यांनी भाकरी फिरवणार असल्याचे संकेत दिले आहेत. बैठकीत शरद पवार यांच्या उपस्थितीतच मतभेदाचे हे वादळ उठले.
रोहित पवार यांनी अनुभवी व्यक्तीकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवावे, अशी थेट मागणी केली. तर, विकास लांबोरे यांनी आमच्याकडे तर 17 वर्षे एकच जिल्हाध्यक्ष असल्याचे सांगत पक्षांतर्गत खदखदीला तोंड फोडले. याचवेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवार यांचा जयंत पाटील यांना विरोध असा प्रश्न उपस्थित करत, हे कसे काय शक्य आहे, अशी विचारणा पत्रकारांनाच केली. तर जयंत पाटील यांनी, मी स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला होण्यास तयार असल्याचे सांगितले. बोलणं सोप असतं, पण चांगला माणूस शोधणे आणि त्याला पुढे आणणे हे अवघड असते, असे सांगून तूर्त तरी आपली बाजू सेफ करण्याचा प्रयत्न केला. पक्षात नवे आणि तरुण नेतृत्व हवे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी पवारांकडे व्यक्त केली. त्यावर पवार यांनीही पक्ष संघटनेत तरुणांना संधी देणार असल्याचे त्याचप्रमाणे संघटना पातळीवर 50 टक्के महिलांना संधी देणार असल्याचे जाहीर केले. यामुळे पवार भाकरी फिरवणार हे स्पष्ट झाले आहे.