सगळीकडे चोरीचे सत्र सुरु आहे. काही ठिकाणी दिवसाढवळ्या तर काही ठिकाणी बंद घरे फोडली जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशीच एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. इस्लामपूर येथील अक्षर कॉलनीमध्ये चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून ७३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना काल मध्यरात्री घडली. याप्रकरणी रामचंद्र जयसिंग कांबळे (अक्षर कॉलनी, रस्ता क्रमांक ३, इस्लामपूर) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याच भागात आणखी एका ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन चोरांनी मिळून हा प्रकार केला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी रामचंद्र कांबळे यांचे कुटुंबीय घराला कुलूप लावून सौंदत्ती (कर्नाटक) येथे देवदर्शनासाठी गेले होते. घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेत रात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घरात घुसून अनोळखींनी सोन्याचे वेढण, गोफ, टॉप्स, चांदीचा छल्ला व देवीची मूर्ती असे साहित्य चोरून नेले.
घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. सांगलीहून श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते. अक्षर कॉलनी परिसरात आणखी एका ठिकाणी याच चोरट्यानी बंद घरात शिरून चोरीचा प्रयत्न केला, परंतु त्याठिकाणी त्यांना हाती काही लागले नाही. श्वानपथक आष्टा नाका परिसरापर्यंत येऊन त्याठिकाणी घुटमळले. चोरीच्या दरम्यान काही लोकांना सुगावा लागताच लोक बाहेर आले, परंतु चोरांनी पलायन केले. तोंडावर मास्क आणि अंगावर जॅकेट घातलेले हे चोर पोलिस शोधत आहेत.