उद्या मकर संक्रांतीचा सण साजरा होणार आहे त्यामुळे बाजारपेठेत गर्दी पहायला मिळत आहे. तिळगुळ, चिक्की, पतंग खरेदी करण्यासाठी लगबग पहायला मिळते. इचलकरंजी बाजारपेठा देखील आकर्षक पतंगांनी गजबजून गेल्या आहेत. तीळगूळ, रेवड्या, साखरेच्या हलव्याबरोबर रंगीबेरंगी पतंग लहानांपासून मोठ्यांचे लक्ष वेधत आहेत. मकर संक्रांतीनिमित्त बाजारात प्लॅस्टिकचे कागदी आणि कापडी असे पर्याय उपलब्ध आहेत. कापडी पतंगांत गरुड, फुलपाखरू, बाघ, ड्रॅगनची चित्रे पाहायला मिळतात. हे पतंग २० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. प्लॅस्टिक प्रिंटमध्ये छोटा भीम, डोरेमॉन, बादी, बेनटेन उपलब्ध आहेत, तर विविध फोटो प्रिंट असलेले पतंगही बाजारात दाखल झाले आहेत. कागदी पतंगांत चांद-तारा आणि तिरंगा प्रसिद्ध आहेत.
या पतंगांची किमत अवधी पाच ते दहा रुपये आहे. अशा विविध आकारांचे फॅन्सी कार्टुन असलेल्या पतंगांना विशेष मागणी दिसून येत आहे. आकारानुसारच्या पतंगांसाठी १० ते १०० रुपये भाव आहे. त्याच्या सोबतीला मांजासुद्धा बाजारात उपलब्ध आहे. मोबाईलच्या महाजालात अडकलेली तरुणाई संगणक किंवा मोबाईलवर खेळ खेळण्यात गुंग आहे. तरुणांना मैदानी खेळांचा विसर पडला आहे. इतकेच नव्हे तर पतंग उडवण्यातही रस राहिलेला नाही.
त्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये पतंग, मांजा विक्रीमध्ये मंदी आली आहे. यंदा ५० टक्यांनी विक्री घटली आहे. एकेकाळी पतंग बनवणारे कारागीर होते. काळाच्या ओघात यांची संख्या घटली आहे. यंदा दुकानदारांनी मांजा विकणार नसल्याचा संकल्प केला आहे. कारण मांजामुळे अनेकदा बोट करपण्याचा किंवा पक्ष्यांना इजा होण्याचा धोका असतो. शिवाय दुचाकीस्वारांनादेखील जीव गमावावा लागल्याने प्रशासनाने मांजावर बंदी घातली आहे.