आटपाडी तालुक्यातील खरसुंडीत खिलार जनावरांच्या यात्रेत पहिल्या दिवशी मोठी आवाक

सध्या सगळीकडेच यात्रांचे दिवस सुरु झाले आहेत. गावोगावी छोट्या मोठ्या यात्रा भरत आहेत. या यात्रांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. तसेच विविध स्पर्धा देखील घेतल्या जातात. सध्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील यात्रेस सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त खिलार जनावरांची मोठी आवक झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश या तीनही राज्यात जातिवंत खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खरसुंडी यात्रेस सोमवार १३ रोजी सुरुवात झाली आहे.

पहिल्या दिवशी दहा हजार खिलारी जनावरांची आवक झाली असून या यात्रेत लाखो रूपयांची उलाढाल होत असते. जातिवंत जनावरांची प्रचंड आवक व दर्दी खरेदीदार यांची मोठ्या प्रमाणावर हजेरी यामुळे हा बाजार तिन्ही राज्यात प्रसिद्ध आहे. मंगळवारी शेळ्या मेंढ्यांच्या खरेदी विक्रीने बाजारास सुरुवात होणार आहे.

भिवघाट रोडवरील वीज मंडळाजवळ हा बाजार भरवण्यात आला आहे. या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असून मंगळवारपासून खरेदी विक्रीला सुरुवात होईल. यात्रा तळावर कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी यांचे तंबू कार्यालय सुरु करण्यात आले असून या ठिकाणी यात्रेच्या अनुषंगाने वीज, पाणी, आरोग्य अशा सुविधा पुरविण्यात येत आहेत.