संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ३१ जानेवारीपासून सुरू होईल. तो १३ फेब्रुवारीपर्यंत चालेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी लोकसभेत आपला सलग आठवा अर्थसंकल्प सादर करतील.स्वातंत्र्यानंतरही सुरू असलेल्या ब्रिटिशकालीन परंपरेनुसार कॅलेंडर वर्षातील पहिल्या संसदीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रप्रमुखांच्या म्हणजे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होईल. लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर लगेचच लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा १० मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे.
पहिल्या टप्प्यात दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर चर्चा होईल आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराने या भागाचा समारोप होईल.अठराव्या लोकसभेचे हे चौथे अधिवेशन असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिले पूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल. हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२४पर्यंत चालले.
या अधिवेशनात लोकसभेच्या २० आणि राज्यसभेच्या १९ बैठका झाल्या. अधिवेशनादरम्यान लोकसभेत पाच विधेयके सादर करण्यात आली. मात्र राज्यघटनेवरील दोन दिवसांची चर्चा वगळता, पूर्ण अधिवेशनात दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार गदारोळाने तहकूब होत राहिले.या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्याची अपेक्षा आहे. याच दरम्यान दिल्ली विधानसभेच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी असून ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल. तेव्हाही संसदीय अधिवेशन सुरू असेल.