जयंत पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ…..

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. असे असतांना आता पुन्हा एकदा राज्यात मोठ्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या बातम्या येण्याची शक्यता आहे.अशात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ‘मी एक कॉल करताच महायुती सरकारमध्ये मंत्री होऊ शकतो, पण शरद पवारांशी गद्दारी करणार नाही’ असे जयंत पाटील म्हणाले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जयंत पाटील यांच्या प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरु होती.

तसेच, त्यानंतर देखील अधूनमधून अशा चर्चा उठत असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आगामी काळात राज्याच्या राजकारणात अनेक भूकंप होणार असल्याचे दावे सतत भाजप नेत्यांकडून केले जात आहे. अशात जयंत पाटील यांनी एक महत्वाचे वक्तव्य केले आहे.

“महाराष्ट्रात अस्थिर असणाऱ्या भाजपला पश्चिम महाराष्ट्रातील आपले संघटन मजबूत करायचे आहे. म्हणून भाजपचे नेते आपल्याभोवती जाळे फेकत आहेत. एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी कार्यक्रमही होऊ शकतो. परंतु ज्यांनी आपले राजकीय जीवन फुलवले आहे, अशा शरद पवारांसाठी आपण कोणताही त्याग करायला तयार आहोत, असे जयंत पाटील म्हणाले.

मात्र, भाजपचा राजकीय विचार आपणाला मान्य आहे का, या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीत कोणाला उमेदवारी मिळणार यावरून तर्कवितर्क सुरू आहेत. विशेष म्हणजे जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.

हातकणंगले मतदारसंघावर अजूनही जयंत पाटलांची पकड आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारी देतांना जयंत पाटलांची भूमिका महत्वाची असणार आहे. अशात जयंत पाटलांच्या वक्तव्यावरून मतदारसंघातील राजकीय घडामोडींची अधिकच चर्चा होत आहे.