ब्रह्मानंद पडळकर यांच्या शिष्टाईनंतर दिघंची येथील आंदोलन स्थगित, पाणी मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार 

टेंभूच्या कामातील भ्रष्टाचाराच्या विरोधात १३ जानेवारीपासून दिघंची येथील शेखर रणदिवे, नवनाथ रणदिवे, बळीराम रणदिवे, अशोक पवार, राहुल बुधावले यांनी आंदोलन सुरू केले होते. काल नवनाथ रणदिवे यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आटपाडी तालुक्यातील टेंभू योजनेचे काम करताना अधिकारी व ठेकेदार यांच्या मनमानी कारभाराने होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण काल पाचव्या दिवशी स्थगित करण्यात आले. माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या शिष्टाईनंतर आंदोलन स्थगित झाले.  

पाच दिवस चाललेल्या आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यावर आंदोलकानी थेट आरोप केला. वरिष्ठांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क झाला नाही. वरिष्ठ त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ही आंदोलकांकडून यावेळी करण्यात आला. काल ब्रह्मानंद पडळकर यांनी तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे, पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या उपस्थितीत आंदोलकाशी चर्चा केली. पडळकर यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.

आंदोलकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. टेंभू योजनेतील भ्रष्टाचाराची संपूर्ण चौकशी होत नाही आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन होत नाही, तसेच योजनेचे पाणी मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा देत त्यांनी उपोषण स्थगित केले. यावेळी उपोषणस्थळी असंख्य नागरिक उपस्थित होते.