वाळवा तालुका धनगर समाजाचा आम. पडळकरांना इशारा! आम. जयंत पाटील यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही

रविवारी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सत्कार समारंभात आमदार जयंतराव पाटील यांच्यावर दुष्काळी भागासाठी काय केले असा प्रश्न करीत टीका- टिप्पणी केली होती. राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आ. जयंतराव पाटील यांनी जत व आटपाडी तालुक्यातील पाण्या पासून वंचित गावांना पाणी देण्यासाठी टेंभू व म्हैसाळ योजनेतून १४ टीएमसी पाणीसाठा आरक्षित केला आहे.

तसेच कृष्णा नदीतून वाहून जाणारे २.५ टीएमसी पाणी उचलून दुष्काळी भागास दिले. असे सांगून आपले कर्तृत्व काय ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वाळवा तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी भाजपा आम. गोपीचंद पडळकर यांना केला. यावेळी वाळवा तालुक्यातील धनगर समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आम. पडळकर यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करीत आमच्या नेत्यावरील टीका- टिप्पणी बंद करा, आम्ही ती खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.

विजयराव पाटील पुढे म्हणाले, सध्याचे राज्य सरकार मॉडेल स्कुल हा उपक्रम राज्यात राबवित आहेत.त्याचे जनक
आम. जयंतराव पाटील आहेत. स्मार्ट पीएचसी हा उपक्रम राज्यात आदर्शवत ठरला आहे. संभाजी कचरे म्हणाले, आम. पडळकर यांनी जाती-जातीत तेढ निर्माण करणारी बेताल वक्तव्ये बंद करून सामान्य जनतेसाठी काम करावे. त्यांनी लोकांची दिशाभूल करू नये.