महायुती पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तेत परतल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग पकडला आहे. ऑपरेशन लोटस्, ऑपरेशन टायगर, आणि आता ऑपरेशन शिवधनुष्यबाण अशा अनेक माध्यमांतून विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कुठेतरी कमकुवत भासू लागलेल्या महाविकास आघाडीतील बडे नेते गळाला लावण्यास सुरुवात झाली आहे. इतके दिवस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची मजबूत पकड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आता कुठेतरी भाजपला चांगले दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे.
याचवेळी आमदार जयंत पाटलांसारखा मातब्बर नेता पक्षात आला तर भाजपची या पट्ट्यात मोठी ताकद वाढणार आहे. त्यात भाजप आणि त्यातही अमित शाह यांच्याकडे असलेल्या सहकार क्षेत्रासाठी जयंत पाटलांसारखा नेता सोबत आल्यानं मोठी चालना मिळू शकते.
आठव्यांदा आमदार, विधानसभेच्या सभागृहातल्या कामकाजाचा मंत्री आणि आमदार म्हणून प्रदीर्घ अनुभव, दांडगा जनसंपर्क, साखर कारखाना, दूधसंघ, बँका यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्राचं विणलेलं जाळं, मतदारसंघात तळागळापर्यंत मान्य करण्यात आलेलं नेतृत्व,पक्षसंघटनेचा अनुभव, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याची राजकीय,भौगोलिक,सामाजिक अंगाने सखोल जाण अशा एक ना अनेक बाबी ज्या भाजपसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह भविष्यातही फायदेशीर ठरु शकतात.