रविवारच्या आठवडा बाजारात मोबाइल चोरीचे सत्र सुरू, नागरिकांची आठवडा बाजाराकडे पाठ

सध्या प्रत्येक भागात चोरीचे सत्र सुरु आहे. दिवसाढवळ्या चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगोला तालुक्यात देखील अश्याच चोरीचे सत्र सुरूच आहे. गावातील आठवड्याच्या बाजारात चोरीचे प्रमाण भरपूर वाढल्याचे दिसून येत आहे. सांगोला शहरात विशेषत: रविवारच्या आठवडे बाजारात गत अनेक महिन्यांपासून मोबाइल चोरीचे सत्र सुरूच आहे. प्रत्येक रविवारी बाजारातून हमखास दहा-पंधरा मोबाइल चोरी जातात.

सातत्याने सुरू असलेल्या मोबाइल चोरीचा कोणताही तपास लागत नसल्यामुळे पोलिस करतात तरी काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.  मोबाइल चोरांसाठी सांगोल्याचा आठवडे बाजार म्हणजे ‘हात की सफाई’साठी पर्वणी ठरत आहे. दुसरे काही नाही  तर किमान मोबाईल तरी मिळवून देणारा हा बाजार चोरट्यांसाठी आवडीचे ठिकाण ठरत आहे. त्यामुळे या मोबाइल चोरट्यांमुळे बहुसंख्य नागरिकांनी सांगोल्याच्या आठवडा बाजाराकडे पाठ फिरवली आहे.

प्रत्येक आठवड्याला मोबाइल चोऱ्या होत असल्यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांना या बाजाराचा धसका घेतला आहे. शहरात दर रविवारी आठवडे बाजारासाठी आजूबाजूच्या खेड्यातील दुकानदारांसह हजारो ग्राहक येतात. मुळातच सांगोला तालुका समृध्द असल्यामुळे अनेकाकडे महागडे मोबाइल आहेत. चोरट्यांनी हीच बाब लक्षात घेऊन दर रविवारी मोबाईल चोरत हात साफ करत आहेत.

मोबाइल चोरीबाबत सांगोला पोलिस ठाण्यात तक्रार नोदविण्यास गेलेल्या नागरिकांना मोबाइल चोरीची नाही तर वर्षांपासून या हरविल्याची तक्रार देण्याचा सल्ला पोलिस देत असल्याचे नागरिक सांगत आहेत. पोलिसांच्या भूमिकेवर सहाजिकच प्रश्नचिन्ह निर्माण होते.