पाचगणीत डॉक्टरांच्या हाय प्रोफाइल पार्टीवर छापा! 13 जणांवर कारवाई

भिलारपासून जवळच असणाऱ्या कासवंड येथील एका निसर्गरम्य ठिकाणावरील संप्रंग रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकून १३ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये चार नर्तिका आणि सहा डॉक्टरांचा समावेश आहे. ते सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यातील आहेत. यातील नऊ जणांवर पाचगणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, कासवंड गावातील संप्रंग रिसॉर्टमध्ये डॉक्टरांसमोर काही युवती तोकड्या कपड्यात बीभत्स हावभाव करत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आंचल दलाल यांना मिळाली. त्यांनी तातडीने साताऱ्यावरून विशेष पथक तिकडे पाठविले.

पोलीस पथक रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कासवंड येथील संप्रंग रिसॉर्टवर पोहोचले. त्यावेळी या रिसॉर्टच्या तळमजल्यात नर्तकींचे नृत्य सुरू होते. त्यांच्यासमोर सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर आणि मिरज येथील एक असे सहा ते सात जण मद्यधुंदावस्थेत पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी चार नर्तिका, सहा डॉक्टर, एक फार्मासिस्ट आणि रिसॉर्ट चालकासह तेरा जणांच्या विरोधात कारवाई केली आहे.