पाककला आणि खाद्य संस्कृती ही महाराष्ट्राची ओळख, अन्न उत्सव हा अभिनंदनीय उपक्रम ; खा. धैर्यशील माने

इचलकरंजी शहरात अनेक विविध रंगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांना इचलकरंजी शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळतो. सध्या इचलकरंजी शहरात रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने अन्न उत्सव आयोजित केलेला आहे. येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आयोजित ‘अन्न उत्सव’ या उपक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने यांनी आपली उपस्थिती दर्शवली. आज पाककला आणि खाद्य संस्कृती ही महाराष्ट्राची ओळख बनलेली आहे. ही संस्कृती राज्यात आणि देशभरात वाढत आहे तसेच ती माणसांना आणि परिवारांना जोडणारी संस्कृती बनली आहे. आज भारतीय खाद्यपदार्थ जगभरात मिळतात त्याचबरोबर जगभरातील पदार्थ आपल्याकडे मिळतात.

अशाच प्रकारे सर्व समाजाला एकत्र आणणारा अन्न उत्सव हा अभिनंदनीय उपक्रम आहे, अशा आशयाचे उदगार खासदार धैर्यशील माने यांनी काढले. यावेळी व्यासपीठावर चितळे डेअरीचे गिरीश चितळे, भिलवडी आणि दावत राईसचे सुभाष छाबडा, इचलकरंजी हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनीही आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले, रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर प्रोजेक्ट चेअरमन अॅड. शिवकुमार धड्ड यांनी प्रास्ताविक करताना उपक्रमाची सर्व माहिती दिली. यावेळी क्लबचे सेक्रेटरी नागेश दिवटे यांनी स्वागत केले, प्रोजेक्ट सेक्रेटरी शीतल भरते यांनी आभार मानले सूत्र संचालन संजय होगाडे यांनी केले.