इस्लामपुरात दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, जलवाहिन्या दुरुस्तीची मागणी

अनेक भागात विविध प्रश्न आहेत. ज्यांचा नागरिकांना खूपच नाहक त्रास सहन करावा लागतो. इस्लामपूर-पेठ रस्त्यावरील बसस्थानक परिसरात काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने पालिकेने व संबंधित कंत्राटदाराने याविषयी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजप नेते विक्रम पाटील यांनी केली आहे.

शहरातील बसस्थानक परिसराला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या वारंवार तक्रारी वाढल्याने भाजप नेते विक्रम पाटील यांनी संबंधित कंत्राटदाराला दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या पाइप तातडीने दुरुस्ती करून दूषित पाणीपुरवठा बंद करण्यास सांगितले आहे. बसस्थानक भागात दुतर्फा गटार बांधणीची कामे सुरू आहेत. या भागात लवकरच काँक्रीटच्या रस्त्याची बांधणी केली जाणार आहे. ‘एमएमआरडीए’कडून या भागात प्रथम गटार बांधणीची कामे केली जात आहेत.


गटारांची खोदाई करताना अनेक ठिकाणी ‘जेसीबी ‘ च्या घावाने घरांमध्ये, सोसायट्यांच्या जलवाहिन्या तुटलेल्या आहेत. या जलवाहिन्या गटारालगत असल्याने गटारीच्या सांडपाण्याचा प्रवाह वाढला की, ते पाणी थेट जलवाहिनीत शिरते आणि घरांमध्ये पोहोचते, असे विक्रम पाटील यांनी स्पष्ट केले. परिसरातील जलवाहिन्यांचे दुरुस्तीचे काम आणि गटार बांधणीचे काम लवकरात लवकर करून दूषित पाण्याचा पुरवठा थांबवावा, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.