मोठी बातमी! महाराष्ट्रात काँँग्रेसचं ‘मराठा’ कार्ड, पटोलेंनंतरचा प्रदेशाध्यक्षपदाचा चेहरा ठरला सोमवारपर्यंत…..

लोकसभेतील यशानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. शंभरपेक्षा जास्त जागा लढलेल्या काँग्रेसला अवघ्या 16 जागा जिंकता आल्या होत्या. यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेसच्या हायकमांडकडे पाठवला होता.त्यानंतर पटोलेंनंतर प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. अशातच आता काँग्रेसच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण,विजय वडेट्टीवार,यशोमती ठाकूर,सतेज ऊर्फ बंटी पाटील, अमित देशमुख यांच्य़ा नावांची जोरदार चर्चा आहे. मात्र, प्रदेशाध्यक्षपदी अनुभवी की तरुण नेत्यांना संधी द्यायची असा पेच काँग्रेस हायकमांडसमोर निर्माण झाला असल्याचे बोलले जात होते. पण अखेर तरुण नेत्यालाच या पदावर संधी देण्याच्या विचारात काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी आहेत.

महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी दोन नावांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.अमित देशमुख आणि सतेज पाटील या दोन नावावर हाय कमांड कडून विचार सुरु अमित देशमुख यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसकडून अमित देशमुख यांच्या नावाची अधिकृत घोषणा सोमवारपर्यंत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.