इचलकरंजी शहरात अनेक विकासकामांचा धडाका सुरु आहे. रस्ते, वाहतूक, पाणी प्रश्न यावर अनेक उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरु आहे. इचलकरंजी शहरात कारखानदार वर्ग मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतो या शहरात वाहनांची वर्दळ कायम पहायला मिळते सध्या इचलकरंजीत वाहतूक तसेच रस्त्यांचा प्रश्न खूपच गंभिर आहे. मोठे तळे ते राजवाडा चौक (लोकमान्य टिळक पुतळा ) पर्यंतचा रस्ता दिवसेंदिवस अरूंद होत चालला आहे. या रस्त्यावर विद्यालय, कॉलेज शासकीय कार्यालय, न्यायालयासह विविध आस्थापनाची दुकाने, रहिवासी भाग आहे.
त्यामुळे सदरच्या रस्त्यावर कायमपणे मोठी वर्दळ असते. या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होऊन अनेक लहान-मोठे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेकजणांना कायमचे अपंगत्व आले. सदर रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी विविध संघटना, राजकीय पक्षाच्यावतीने करणेत आली होती. मोठे तळे ते राजवाडा चौकापर्यंतचा रस्ता १८ मीटर रुंद करण्याबाबतची अंतिम अधिसूचना नगररचना विभागाच्यावतीने प्रसिध्द केली होती. त्यानंतर सदर रस्त्याच्या मध्यपासून समसमान पध्दतीने रस्ता रुंद करण्याबाबतची मागणी सदर परिसरातील मिळकतधारकांकडून झाली होती.
रस्ता रूंदीकरणामध्ये बाधित होणारी जागा महानगरपालिकेने ताब्यात घेतली नव्हती. जागा संपादनाबाबत ज्या मिळकतधारकांची जागा रस्त्यांमध्ये जाणार होती. त्यांना टीडीआर देण्यासंदर्भात महानगरपालिकेचे पहिले तत्कालीन आयुक्त सुधारकर देशमुख यांनी १७ फेब्रुवारी २०२३ रोजी बैठक घेतली होती. मात्र, सदर बैठकीमध्ये टीडीआर देण्यासंदर्भात अथवा बाधित जागेच्या बदल्यात आर्थिक मोबदला देण्यासंदर्भात निर्णय झाला नव्हता. त्यामुळे सदर रस्त्यांच्या रूंदीकरणाचा प्रश्न प्रलंबितच राहिला होता. परंतु या रस्त्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडीमुळे सदरच्या रस्त्याचे रुंदीकरण तातडीने व्हावे, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
सदर रस्त्याचे रुंदीकरणाची गरज ओळखून आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या मिळकतधारकांची बुधवार दि. २९ रोजी दुपारी १२ वाजता आयुक्त कार्यालयात बैठक बोलावली असल्याचे पत्रक सहा. संचालक नगररचना यांनी काढले असून सदर पत्राच्या प्रती संबंधित मिळकतधारकांना देण्यात आल्या आहेत. सदर बैठकीत रस्ता रुंदीकरणाबाबत सकारात्मक चर्चा होऊन सदरचा रस्ता तातडीने रुंदीकरण करण्यासंदर्भात चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.