सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल हा पहायला मिळतच आहे. मोबाईलची भुरळ प्रत्येकालाच आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यत मोबाईल हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हाती फोन असतोच. सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येकाला सेल्फी आणि रिल्सने भुरळ पाडली आहे. गुड मॉर्निंग पासून ते गुड नाईट पर्यंत चा प्रवास हा सोशल मीडियावर व्यक्त होतो. अशा या जीवनात ज्ञानमंदिर अर्थात शैक्षणिक संस्थेवर देखील सेल्फी आणि रिल्स बनू लागले आहेत. भावी पिढीचे भविष्य घडवणाऱ्या शाळा आणि कॉलेज स्तरावर फिल्मी स्टाईलने विद्यार्थी रिल्स बनवतात. एवढेच नव्हे तर आता शिक्षक ही कमी नाहीत. यामुळे शिक्षण देणारे ज्ञान मंदिर सेल्फी पॉईंट आणि रिल्स पॉईंट बनू पाहत आहेत.
दरम्यान शाळा स्तरावर अनेक मान्यवरांच्या प्रबोधनातून विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर अनेकदा मार्गदर्शन केले जात असते. याबाबत त्या त्या कॉलेज आणि शाळा स्तरावरून त्या मान्यवराच्या मार्गदर्शनाची प्रसिद्धी आणि प्रचार केला जातो. परंतु त्याचे अनुकरण करण्यामध्ये अनेकदा काही शाळा आणि कॉलेज दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा कितपत फायदा झाला याबाबत ही शंका उपस्थित केल्या जात आहेत.
शैक्षणिक संस्थेकडे निश्चितपणे ज्ञानाचे मंदिर म्हणून पाहिले जाते त्याचे पावित्र्य या पुढील काळात जपण्यासाठी संस्थाचालकांनी पुढाकार घ्यावा तसेच शिक्षकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आपण ज्ञान मंदिरामध्ये आहोत याचे भान ठेवावे आणि यावर संस्थाचालक व संबंधित प्रशासनाने याला निर्बंध घालावेत अशी मागणी पालक वर्गातून जोर धरत आहे.