‘स्वच्छ सर्वेक्षण- २०२५’ व ‘माझी वसुंधरा-५.०’ अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगोला नगरपरिषदेमार्फत विविध व प्रशिक्षण स्पर्धा, कार्यशाळा तसेच होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी दिली. जागतिक महिला दिनानिमीत्त सांगोला नगरपरिषदेच्या वतीने दि. ६ मार्च रोजी स. ११ वाजता महिलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता ‘पाककला स्पर्धा’ तसेच दुपारी २ वा. ‘रांगोळी स्पर्धे चे’ आयोजन करण्यात आले आहे.वरील दोन्ही स्पर्धेतील प्रत्येकी पहिल्या ३ क्रमांकांना रक्कम रुपये ५ हजार, ३ हजार, २ हजार व उत्तेजनार्थ बक्षीसेही दिली जाणार आहेत.
दि. ७ मार्च रोजी सकाळी ११ वा. महिलांसाठी ‘केमिकल फ्री फ्रुट पल्प प्रिझर्वेशन व फ्ल- ओरल ड्रिंक’ (फुलांचे सरबत) या विषयावर प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तर, दि. ८ मार्च रोजी होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा, लकी ड्रॉ व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. वरील सर्व कार्यक्रम हे सांगोला शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह ( टाऊन हॉल) येथे येथे होणार आहेत. तरी, सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.