इचलकरंजी शहरात ४० हजारावर यंत्रमाग श्रमिकांना पगारवाढीची प्रतीक्षा….

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात यंत्रमाग भरपूर प्रमाणात पहायला मिळतात. परगावचे लोक इचलकरंजीत कामानिमित्त स्थायिक झालेले आहेत. राज्याचे मँचेस्टर अशी ओळख असलेल्या इचलकरंजीत यंत्रमाग व्यवसायाची प्रगती होत असताना त्याला हातभार लावणाऱ्या कामगारांना काही प्रमाणात लाभ मिळावा असा विचार होत राहिला.

२०१३ साली इचलकरंजीत यंत्रमाग कामगारांचे मोठे आंदोलन उभे राहिले होते. तेव्हा यंत्रमाग कामगार, यंत्रमाग धारक संघटना व कामगार सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांच्यात संयुक्त करार झाला. त्यानुसार कामगारांना मूळ वेतन ५५५८ रुपये अधिक २५० रुपये महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कामगारांना ५२ पिकास (कापड मोजण्याचे एक परिमाण) प्रति मीटर ८२ पैसे मजुरी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता.

दरवर्षी जानेवारीत महागाई भत्ता कामगारांना देण्याचे ठरल्याने तदनुसार द्दरवर्षी मजुरी वाढ मिळत गेली.२०१७ साली यामध्ये विघ्न आले. त्यावर्षी कामगारांना प्रतिमाह ४६४ रुपये महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. यंत्रमागधारकांच्या सर्वच संघटनांनी मजुरी वाढ देणार नाही अशी भूमिका घेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे २०१३ सालच्या करारातून बाहेर पडत असल्याचे निवेदन सादर केले. त्यानंतर पुढे दरवर्षी कामगारांची मजुरी वाढ सहाय्यक कामगार कार्यालयाकडून जाहीर होत असली तरी ती प्रत्यक्षात कामगारांना मिळत नसल्याने ते कामगारांच्या दृष्टीने दिवास्वप्न ठरले आहे.