सांगली जिल्ह्यात भाजप महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर मंत्रिपदाची माळ कोणाकोणाच्या गळ्यात पडणार? याची चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, खानापूरचे सुहास बाबर व जतचे गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपदाची संधी आहे. महायुतीचे सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे पुन्हा निवडून आले आहेत.
खानापूरचे सुहास बाबर यांनी जिल्ह्यात विक्रमी मताधिक्य मिळविले आहे. दिवंगत आमदार अनिल बाबर यांचा वारसदार म्हणून सुहास यांना राज्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनिल बाबर एकनिष्ठ राहिले होते. शिदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही अनिल बाबर पहिल्याच टप्प्यात त्यांच्यासोबत गेले होते. या निष्ठेची पावती म्हणून सुहास बाबर यांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते.
गोपीचंद पडळकर हेदेखील मंत्रिपदाच्या शर्यमतीत असल्याचे मानले जाते. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. आजवर त्यांनी विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे. आता थेट लोकांतून निवडून आल्याने मंत्रिपदाची दावेदारी वाढली आहे. भाजपच्या कोट्यातून त्यांना राज्यमंत्रीपद मिळू शकते.