सांगोला – आंध्र प्रदेश पोलिसांची कामगिरी! आंध्र प्रदेशात चोरी करुन आलेल्या चोरट्यास दागिन्यांसह अटक

खून, मारामारी, अपघात तसेच फसवणुकीच्या प्रकारात वाढ झालेली आहे. दिवसाढवळ्या होत असलेल्या चोरींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तर आहेच त्याचबरोबर पोलिसांसमोर एक मोठे आव्हान देखील आहे. धर्मावरम (आंध्र प्रदेश) पोलीस स्टेशन हद्दीत सोने चोरी करून सांगोला तालुका हद्दीत पळून आलेल्या संशयित इसमास आंध्र प्रदेश पोलीस व सांगोला पोलिसांच्या पथकाने सोमवारी सांगोला बसस्थानक परिसरात गणेश संजय रुपटक्के (वय २६ रा. पिंपरी (खु.), ता. आटपाडी, जि. सांगली) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून २४५.६५ ग्राम सोने जप्त करुन कारवाई केल्याचे पो. नि. भीमराव खणदाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


आंध्र प्रदेश राज्यातील धर्मावरम फस्ट टाऊन पोलीस ठाण्यातील पोकॉ नागांजनेलू यांचे पोलीस पथकाने सांगोला पोलीस ठाण्यात येवून धर्मावरम पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध घेण्याकामी सांगोला येथे हजर झाले. त्यांनी पो. नि. भीमराव खणदाळे यांना लेखी पत्र देऊन मदतची विनंती केली. सांगोला पोलीस स्टेशनचे पो. नि. सचिन जगताप, पोलीस हवालदार दत्ता बजाळे, विकास क्षीरसागर, पोकॉ. मारुती पांढरे असे तपास पथक तयार करून आंध्र प्रदेश पोलीस यांच्यासोबत रवाना केले. पोलीस तपासादरम्यान संशयित गणेश संजय रुपटक्के हा सांगोला एसटी स्टँड व आजूबाजूच्या परिसरात दिसून आल्याने त्याची चौकशी केली.

त्यानुसार संशयितास हटकले असता तो पळून जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यास पकडले व दोन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे साडेचोवीस तोळे सोन्याची लगड सपोनि सचिन जगताप यांनी तपासकामी जप्त केली व संशयित गणेश संजय रुपटक्के यास पुढील तपास कामी आंध्र प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, संशयित प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. भीमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांच्या पथकाने केली.