बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान अनेक वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. अनेक दिवसांपासून तो रुपेरी पडद्यापासून दूर आहे. पण 2024 मध्ये तो धमाकेदार कमबॅक करणार असल्याचं समोर आलं आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच तो त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग सुरू करणार आहे.
आमिर खान अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. करीना कपूर (Kareena Kapoor) अभिनीत ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या सिनेमात शेवटचा दिसला होता. आमिरचा हा सिनेमा रुपेरी पडद्यावर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर त्याने सिनेसृष्टीपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. 2023 मध्ये आमिरचा एकही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. आमिरला आता मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आणिर खान सिनेसृष्टीत धमाकेदार कमबॅक करणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आमिर खानच्या आगामी सिनेमाचं शूटिंग जानेवारी महिन्यात सुरू होणार आहे. एसआर प्रसन्ना या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. सध्या या सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनचं काम सुरू आहे. प्री-प्रोडक्शनचं काम पूर्ण झाल्यानंतर निर्माते 29 जानेवारीपासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करू शकतात. मुंबईत या सिनेमाच्या शूटचं पहिलं शेड्यूल पार पडणार आहे.
आमिर खानचा आगामी सिनेमा हा 2018 मध्ये आलेला स्पॅनिश सिनेमा ‘कैम्पियन्स’चा रिमेक आहे. प्रसन्ना गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाच्या संहितेवर काम करत आहे. आमिर खानदेखील या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. एका रागिट प्रशिक्षकावर आधारित हा सिनेमा आहे. गतीमंद मंडळींना एकत्र करुन एक टीम बनवणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. या सिनेमाचं कास्टिंग खूप महत्त्वाचं असणार आहे. या सिनेमात आमिर खान मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमासाठी योग्य कलाकारांची निवड करण्यासाठी अनेकांची ऑडिशन घेण्यात येणार आहे.