सांगोला यात्रेतील पाळणेवाल्याला खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

सध्या सर्वत्र यात्रांचे दिवस आहेत. त्यामुळे भाविकांची रेलचेल पहायला मिळते. आजपासून सांगोला येथील अंबिका देवीची यात्रा सुरु झालेली आहे. या यात्रेस भाविक दर्शनासाठी खूपच गर्दी करीत असतात. अंबिका देवी यात्रेत पाळणे लावण्यासाठी आलेल्या दोन महिला व तिच्या मुलास शिवीगाळ, मारहाण करून तुम्हाला येथे पाळणे लावायचे असतील तर एक लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल अशी धमकी दिली.

या प्रकरणी वृद्ध महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सांगोला शहरातील दोघांवर गुन्हा दाखल झाला. ही घटना बुधवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास सांगोला शहरातील मार्केट यार्ड येथे घडली आहे. अंजुबाई सोपान इंगोले (वय ७५, रा. वाढेगाव, ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी सकाळी ११.४५ च्या सुमारास फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा नवनाथ व कमळबाई भिवा चव्हाण असे सांगोला येथील अंबिका देवी यात्रा असल्याने मार्केट यार्ड येथे पाळणे लावत होते.

आरोपी निखील गडहिरे ( रा. भीमनगर, सांगोला) व एक अनोळखी व्यक्ती ( नाव, पत्ता माहीत नाही) असे येऊन मोठ्याने आरडाओरड करू लागले. तुम्ही कोणाच्या परवानगीने पाळणे लावत आहात, तुम्हाला या ठिकाणी पाळणे लावायचे असतील तर मला एक लाख रुपये द्यावे लागतील नाहीतर तुम्हाला मी यात्रेत पाळणे लावू देणार नाही व तुमचे पाळणे चालू देणार नाही, असे म्हणून शिवीगाळी करून फिर्यादी, फिर्यादीचा मुलगा नवनाथ व कमळबाई भिवा चव्हाण यांना हाताने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीस पैसे नाही दिले तर तुझ्या मुलांना गाडीखाली चिरडून मारून टाकीन अशी धमकी दिल्याची घटना घडली आहे. याबाबत अंजुबाई इंगोले यांनी निखील गडहिरे व एक अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोसई माहुरकर तपास करीत आहेत.