वंदेभारत रेल्वे सेवा लवकरच सुरू करणार…..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रेल्वसेवा जागतिक दर्जाची बनविण्याचे स्वप्न आहे.त्याचेच प्रतीक असलेली वंदेभारत रेल्वे सेवा कोल्हापुरातून लवकर सुरू करू, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी येथे दिले.

कोल्हापूर ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्‍स्‍प्रेसच्या नव्या रूपातील (एलएचबी कोच) रेल्वे सेवेचे श्री. दानवे यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून मुंबईतून हिरवा झेंडा दाखवून उद्‌घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. राजर्षी शाहू महाराज टर्मिनन्सवर या सोहळा झाला. खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik), धैर्यशील माने, संजय मंडलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ, विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे उपस्थित होते.

मंत्री दानवे म्हणाले, हातकणंगले ते इचलकरंजीचा आठ किलोमीटरच्या रस्त्यासाठी सर्वेक्षण, डीपीआर तयार झाला. कामही लवकरच सुरू होईल. खासदार महाडिक म्हणाले, रेल्वेच्या विविध प्रश्नांवर तिन्ही खासदारांनी एकत्रित पाठपुरावा केला. त्याची दखल घेत रेल्वेमंत्री दानवे यांनी नव्या रूपातील महालक्ष्मी एक्सप्रेसची सेवा सुरू केली.

रेल्वे प्रवाशांच्या हितांच्या अन्य मागण्यांची दखल घेतली आहे. जिल्‍ह्याच्या विकासाला बळ देणारी वंदे भारत दोन महिन्यांत सुरू करण्याचे आश्वासन मिळाले आहे. सह्याद्री एक्‍स्‍प्रेस मुंबईपर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.