येथील श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग मंदिरात शनिवारी (ता. २१) जोतिबा देवाचा जागर सोहळा होणार असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज जागर सोहळा असल्याने दीड लाखाच्या पुढे भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिरात दर्शन रांगा व बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी सांगितले.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या आज सहाव्या दिवशी दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची पाच पाकळी सोहन कमळपुष्पातील राजेशाही थाटातील खडी महापूजा बांधण्यात आली. ही महापूजा गावातील दहा गावकर व पुजारी यांनी बांधली.
आजही मंदिरात भव्य दिव्य असा धुपारती सोहळा पार पडला. या वेळी हजारो भाविक उपस्थित होते. ‘चांगभलं’च्या जयघोषाने डोंगर दुमदुमला. दुपारी बारा वाजता मंदिरात तोफेची सलामी देण्यात आली.