इचलकरंजीत प्रधानमंत्री आवास २.० घरकुल योजनेची नोंदणी सुरु

सध्या सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा पुरेपूर लाभ देखील मिळतो. सध्या प्रधानमंत्री आवास योजना सरकार तर्फे राबवली जात आहे. केंद्र शासन पुरस्कृत ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०’ अंतर्गत नविन घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. इचलकरंजी शहरातील नागरिकांनी महापालिकेतील प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या कार्यालयामध्ये संपर्क साधून सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्यावतीने देशातील ज्या नागरिकांना राहण्यासाठी स्वतःचे घर उपलब्ध नाही, अशा पात्र लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती. सदरची योजना काही दिवसापासून बंद करण्यात आली होती. त्यास केंद्र शासनाने आता मंजुरी दिली असून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० नावाने नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ३० चौरस त्याची पक्की घरे बांधून देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाच्यावतीने काही अटी व शर्ती लागू करण्यात आले असून लाभार्थ्यांना स्वहिस्साही भरावा लागणार आहे.

अटी व शर्तीसह सर्व सोपस्कार पार झाल्यानंतर घर बांधकामासाठी केंद्र शासनाच्यावतीने तीन टप्प्यांमध्ये निधी उपलब्ध होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून सर्व कागदपत्रे महानगरपालिकेकडे जमा करावी. कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना सदर घरकुलांचा लाभ देण्यात येणार असल्याचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले असून शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

मंजुरीनंतर पात्र लाभार्थीला पक्के घर बांधणी साठी शासनाद्वारे रु.२.५ लाख प्रोत्साहनात्मक अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये राज्य शासनाद्वारे रु. १ लाख व केंद्र शासनाद्वारे रु. १.५ लाख अनुज्ञेय आहेत. पक्के घरकुल बांधणीसाठी लाभार्थीला स्वहिस्सा म्हणून अंदाजे किमान रु. ५ ते ९ लाख रुपये उभे करण्याची तयारी असणे आवश्यक आहे.

लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती
अर्जदाराचे तसेच कुटूंबामधील इतर सदस्यांच्या नावे पक्के घर नसावे. अर्जदाराने अथवा त्याच्या कुटुंबातील कोणीही गेल्या २० वर्षात कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला
नसावा. वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा ३ लक्ष रुपये आहे
लाभार्थ्यांनी किमान ३० चौरस मीटर पक्के घरकुल (आर.सी.सी.) बांधणे आवश्यक आहे
घरकुल हे पती पत्नी दोघांच्या संयुक्त नावे असेल