एसटी कंडक्टरसोबत सुट्ट्या पैशावरुन होणारा वाद कायमचा मिटणार; महामंडळाचा मोठा निर्णय

राज्यात एसटी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कमी दरात राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी एसटीचा पर्याय उत्तम मानला जातो. एसटी प्रवासावेळी सुट्ट्या पैशांवरुन कंडक्टरसोबत वाद आता सर्वसाधारण बाब झाली आहे. तिकिटासाठी सुट्टे पैसे नसतील तर अनेक प्रवाशी कंडक्टरसोबत हुज्जत घालताना दिसतात. पण आता हा वाद कायमचा मिटणार आहे. एसटी महामंडळाने यासंदर्भात मोठा निर्णय घेत प्रवाशांना गुड न्यूज दिलीय.  

प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहकांना होणारा त्रास याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतलीय. यांसदर्भात त्यांनी प्रशासनाला  सूचना केल्या आहेत.  सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांच्या मध्ये वाद होऊ नये यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआय पेमेंट द्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय.मागील काही दिवसांपासून युपीआय पेमेंट द्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. याबरोबरच महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन रकमेमध्ये 100 रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याची निर्देश स्थानीक प्रशासनाला दिले आहेत.त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्ट्या पैशावरुन होणारे वाद टाळले जाऊ शकतात.

एसटी महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (ETIM) दिले आहेत. या मशीनच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट द्वारे तिकीट काढले जाऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या यूपीआय पेमेंटचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील.