नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी कामगार पक्षातर्फे कवलापूर, मणेराजुरी, तिसंगी, सावळज, गव्हाण, डोंगरसोनीसह व इतर बाधित गावांमध्ये शेकडो शेतकऱ्यांनी काळे झेंडे लावून निषेध केला. याबाबत दिगंबर कांबळे म्हणाले, नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गाबाबत गेल्यावर्षी आजच्या दिवशी सक्तीच्या भूसंपादनाचे राजपत्र जाहीर केले होते. या जुलमी शेतकरीविरोधी राजपत्राला एक वर्ष पूर्ण झाले. शेतकरी कामगार पक्षाच्या झेंड्याखाली शेतकरी सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करा व शेतकरीहिताच्या कायद्याची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.
शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या कुणाचीही मागणी नसलेल्या, हजारो शेतकऱ्यांना बेरोजगार करणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी सक्तीने जमिनी काढून घेण्याचा अध्यादेश सरकारने काढला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते शरद पवार, जिल्हाध्यक्ष घनःश्याम नलावडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, विष्णू सावंत, राहुल जमदाडे, शिवाजी शिंदे, रमेश कांबळे, गजानन सावंत, गजानन पाटील यांच्यासह बाधित शेतकऱ्यांनी निषेध नोंदविला.