आता पास व्हावंचं लागेल! पाचवीसाठी आणि आठवीसाठी एवढे गुण गरजेचेच! परीक्षांचं नेमकं स्वरुप काय?

आता इयत्ता पाचवी (5th Standard) आणि इयत्ता आठवीच्या (8th Standarad) वर्गांमधल्या विद्यार्थ्यांना आता पुढील वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी पाचवी आणि वार्षिक परिक्षेत उत्तीर्ण होणं बंधनकारक करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी निकष ठरवण्यात आले आहेत. इतत्ता पाचवीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 18 गुण आणि आठवीत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 21 गुण सक्तीचे करण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण  (Education Department) विभागानं हा मोठा निर्णय घेतला असून त्यासाठी शिक्षण हक्क कायदा 2011 मध्ये सुधारणा करण्यात आली. 

पाचवीची वार्षिक परीक्षा ही 50 गुणांची तर आठवीची वार्षिक परीक्षा 60 गुणांची असणार आहे. त्यामुळे या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे. राज्य शासनाकडून त्याच संदर्भात परीक्षांची आणि मूल्यमापनाची कार्यपद्धती जाहीर करण्यात आलीये. 

वार्षिक परीक्षेसाठी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी वेगवगेळ्या पद्धतीची कार्यपद्धती असणार आहे. इयत्ता पाचवीसाठी 50 पैकी 18 गुण म्हणजेच 35 टक्के असणं आवश्यक आहे. तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयात 60 पैकी 21 गुण म्हणजेच 35 टक्के असणं गरजेचं असणार आहे. पाचवीसाठी सवलतीचे कमाल दहा गुण आणि आठवीसाठी कमाल पाच गुण देण्यात येतील. तसेच नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ही जून महिन्यात घेण्यात येणार आहे, अशी माहिती शासन निर्णयातून देण्यात आलीये. 

राज्य शासनाच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात मुलांमध्ये नापास झाल्याने आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्याचमुळे पहिली ते आठवीपर्यंत मूल्यांकन पद्धत आणण्यात आली होती. पण या मूल्यांकन पद्धतीमुळे मुलांची प्रगती खुंटत असल्याचं मत पालकांनी व्यक्त केलं. त्यामुळे हा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने बदलण्याचा निर्णय घेतला. 

शालेय परीक्षांचे नियंत्रण करण्यासाठी आणि पर्यवेक्षण करण्यासाठी राज्य  जिल्हा, तालुका, केंद्र स्तरावर सनियंत्रण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या परीक्षा शाळांमध्येच घेतल्या जातील. पण शाळांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रस्तरीय भरारी पथके ही शाळांमध्ये परीक्षा कालावधीमध्ये भेटी देतील. त्यामुळे  कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी मदत होईल. त्याचप्रमाणे आता पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटानुसार प्रवेश दिला जाईल. पण सहावीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पाचवीची परीक्षा उत्तीर्ण करणं अनिवार्य असणार आहे.