दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या स्मृती विकासकार्यातून चिरंतन जपल्या जाणार ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

काल स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रथम स्मृतिदिनी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी त्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. विटा येथे बाबर कुटुंबीयांच्या निवासस्थानी दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर एका शाळेत आयोजित अभिवादन कार्यक्रमात दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

यावेळी आमदार सुहास बाबर, अमोल बाबर व बाबर परिवारातील सदस्य, मकरंद देशपांडे, मोहन व्हनखंडे, विटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोदराव गुळवणी, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्या डॉ. मेघा गुळवणी, देवदत्त राजोपाध्ये, माजी नगरसेवक अनिलअप्पा बाबर आदि उपस्थित होते. उच्च पदावर असूनही दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी सर्वसामान्य माणसाचे दुःख सदैव घेतले. विद्यार्थ्यांनी त्यांचा नम्रपणा हा गुण समजून घ्यावा. विकासकार्यातून अनिल बाबर यांच्या स्मृती चिरंतन जपल्या जातील, अशा शब्दात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदरांजली अर्पण केली.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी मतदारसंघात केलेली विविध विकासकामे पुढील पिढ्यांना उपयोगी ठरतील. त्यांच्या वारशाचे जतन व्हावे. कार्यमग्न राहणे, सर्वसामान्य माणसाबद्दल आपुलकी या दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या गुणांचा आदर्श घ्यावा असे ते म्हणाले. बाबर यांच्या निवासस्थानी कलाशिक्षक कार्यक्रमात शशिकांत आलदर यांनी रेखाटलेल्या दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या चित्राचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.