विटा पालिकेचा कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात


नगरपरिषदेतील मयत कर्मचाऱ्याच्या सेवा कालावधीतील देय रकमेचा धनादेश काढण्यासाठी २५ हजाराची लाच घेणारा कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. याप्रकरणी नगरपरिषदेतील कर्मचारी पुंडलिक हिरामण चव्हाण (वय४९ ) रा. विटा याला अटक करण्यात आली आहे.

विटा नगरपरिषदेत नोकरीस असलेल्या एका कर्मचाऱ्याचे दोन महिन्यापूर्वी निधन झाले. या कर्मचाऱ्याच्या सेवा कालावधीतील दे रक्कम काढण्यासाठी कुटुंब प्रयत्नशील होते. परंतु आपल्याच सहकाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबांना मदत करण्याऐवजी पुंडलिक चव्हाण यांनी त्यांना २५ हजार रुपयांची मागणी केली. नगरपरिषदेतील एका मयत कर्मचाऱ्याचे सेवा कालावधील रक्कम देण्यासाठी दुसरा कर्मचारी २५ हजाराची लाच मागतो, हेच धक्कादायक होते. आपल्या हक्काचे पैसे देखील मिळत नसल्याने संबंधित मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाने लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करून लाच लुचपत विभागाने विटा येथे छापा टाकला.

लाचलुचपत विभागाने छापा टाकून पुंडलिक चव्हाण यास २५ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.