वाळवा तालुक्यातील ‘या’ गावाने केली बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी, ग्रामसभेत ठराव मंजूर

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदललेली पहिली अनेक पक्षप्रवेश देखील झाले. विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले आणि महायुतीची सत्ता स्थापन झाली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.विधानसभेत झालेल्या पराभवानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्यानं ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे.

बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सांगलीमधून मोठी बातमी समोर आली आहे. ईव्हीएम हटवण्यासाठी राज्यातील काही गावातून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी करण्यात येत आहे, आता सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या बहे गावानं देखील बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. ग्रामसभेत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे, जर सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला आहे.

ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशी भूमिका सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गावाने घेतली आणि अख्ख्या देशाचे लक्ष या गावाकडे लागलं. मतपत्रिकेवर मतदान घेण्याचं पाऊल देखील गावाने उचललं, मात्र सरकारने ते दडपले. आता मारकडवाडीतून सुरू झालेल्या या आंदोलनाचं लोन राज्यातील काही गावांपर्यंत पोहोचलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या बहे गावानं देखील बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. ग्रामसभेत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे, स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या बहे गावाने हा ठराव घेत इस्लामपूर तहसीलदारांकडे तो सुपूर्द केला आहे.