आष्ट्यातील विद्यार्थ्यांवर निर्भया पथकाची कारवाई

अलीकडच्या काळात गुन्हेगारी क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्लामपूर येथील निर्भया पथकाच्या वतीने आष्टा शहरातील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. यावेळी शाळेला दांडी मारून थांबलेल्या पंचवीस विद्यार्थी व विद्यार्थिनींवर कारवाई करण्यात आली.

निर्भया पथकाने आष्टा शहरातील हुतात्मा स्मारक, एसटी स्टॅण्ड परिसर, बिरोबा मंदिर परिसर, हनुमान मंदिर याठिकाणी शाळा सोडून थांबलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींवर कारवाई केली. शाळेला जातो म्हणून या विद्यार्थ्यांनी पालकांना तसेच शाळा व शिक्षकांना फसवले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून घेऊन पालकांसमोर या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले.
त्या सर्वांना इस्लामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक संपत वारके, महिला कॉन्स्टेबल प्रियांका देसाई, वर्षा घस्ते, कॉन्स्टेबल सुनील पाटील यांनी कारवाई केली.