सध्याच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने भीतीचे तर वातावरण आहेच त्याचबरोबर दिवसाढवळ्या चोरीचे प्रमाण वाढल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. सांगोला तालुक्यात देखील चोरी प्रकरणात भरमसाठ वाढ झाली आहे.अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील ठेवलेले सोन्याचे गंठण, सोन्याचे नेकलेस, अंगठी व कानातील झुबे असे सुमारे सात तोळे आठ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चिकमहूद, बंडगरवाडी (ता. सांगोला) येथे घडली आहे. अनिल शिवाजी बंडगर ( रा. चिकमहूद बंडगरवाडी, ता. सांगोला) हे वरील ठिकाणी आपल्या कुटुंबासह राहतात. अनिल बंडगर यांचे दोन मजली घर असून आई, वडील खालच्या मजल्यावरील घरात असतात. तर बंडगर आपल्या पत्नी व मुलासह घराचे दुसऱ्या मजल्यावर झोपी गेले होते. रविवारी रात्री दहाच्या सुमारास बंडगर यांच्या घरातील सर्व कुटुंबीय जेवणखाण करून झोपी गेले होते.
परंतु झोपी जाताना अनिल बंडगर यांच्याकडून वरच्या खोलीचा दरवाजा नजरचुकीने उघडा राहिला होता. दरम्यान सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास अनिल बंडगर यांना झोपेतून जाग आली. त्यावेळी त्यांना घरात बॅटरीचा उजेड दिसला म्हणून ते वरच्या मजल्यावरील घरातून जिना उतरून खाली आले असता घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले. बंडगर हे बेडरुममध्ये गेले असता बेडरुममधील कपडे व इतर सामान अस्ताव्यस्त पडलेले होते तर घराचा दरवाजा उघडा दिसला म्हणून त्यांनी परत बेडरुममध्ये येऊन कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने पाहिले असता ते कपाटात कोठेही दिसून आले नाही. त्यांनी घरात आजूबाजूला दागिन्यांचा शोध घेतला असता ते कुठेही मिळून आले नाहीत.
यावरून अनिल बंडगर यांची खात्री झाली की रात्री झोपी जाताना घराच्या हॉलचा दरवाजा अजानतेपणाने घाईगडबडीत उघडा राहिला होता. त्यामुळे चोरट्याने चोरी केली आहे. याबाबत अनिल बंडगर यांनी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले सुमारे तीन लाख ९० हजार रुपये किमतीचे सात तोळे व आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याबाबत फिर्याद दाखल केली आहे.