सध्या सर्वत्र शक्तीपीठ महामार्ग हा मुद्दा खूपच गाजत आहे. अनेक भागातून याला संमती तर काही भागातून याला विरोध देखील दर्शविला जात आहे. हातकणगले तालुक्यातील माणगांव येथे शक्तीपीठ विरोधी कृती समितीने जनजागृती फेरी आयोजित केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ रद्द झाले असताना परत कोणी मिठाचे खडे टाकून राजकरण करु नये, कोणी दबाव आणत असतील तर शक्तीपीठ विरोधी कृती समीतीशी संपर्क साधा, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू. जे आमदार शक्तीपीठ संदर्भात समर्थन करत आहेत. त्यांची यादी जाहीर करावे ते घरातून बाहेर पडणार नाहीत, असा इशारा शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक गिरीश फोंडे यांनी केले.
दरम्यान, मुख्यमंत्री यांना आमदारांना भेटायला वेळ नाही, मग हे आमदार त्यांना कधी भेटले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानाचे खिल्ली उडवत, जर जमिनीच घ्यायचे असतील, तर आमदार व खासदार यांच्या जमिनी घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी चौकातून जनजागृती रॅलीस प्रारंभ झाला. रॅली ग्राम पंचायत समोर येताच त्याचे समेत रूपातंर झाले. निमशिरगांवचे माजी उपसरपंच शिवाजी कांबळे यांनी शक्तीपीठ महामार्ग होवू देणार नाही, असे स्पष्ट केले. या ठिकाणी शक्तीपीठ विरोध कृती समितीने सरपंच राजू मगदूम यांना निवेदन दिले.
निवेदनानंतर सरपंच राजू मगदूम यांनी, माणगांव येथे झालेली ग्रामसभा शांतेतेने झाली असून यामध्ये शक्तीपीठ समर्थनात कोणताही ठराव झाला नाही. मात्र माणगाव ग्रामसभेमध्ये गोंधळ व शक्तिपीठ महामार्गाबद्दल ठराव, असे काहीही झाले नाही. ग्रामपंचायत नेहमी शेतकऱ्यांच्या बरोबर राहील, असा खुलासा करत कोणीही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.
