अवकाळी पावसाने सांगोला तालुक्यातील २५० शेतकऱ्यांचे सुमारे इतक्या रुपयाचे नुकसान!

सांगोला अवकाळी पावसाने सांगोला तालुक्यातील ३५ गावातील सुमारे २५० शेतकऱ्यांच्या १८५.२ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे, डाळिंबासह इतर शेती पिकांचे सुमारे ४१ लाख २ हजार ९८० रुपयाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा अहवाल जिल्हाधिकारी, सोलापूर कार्यालयाकडे पाठविल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगितले.

सांगोला तालुक्यात ८, ९ तसेच २७ ते ३० नोव्हेंबर या दरम्यान पडलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील लोटेवाडी, शिरभावी, अजनाळे यलमर मंगेवाडी, सोनंद, डोंगरगाव आदी गावातील द्राक्षे, डाळिंब फळबागांसह शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यामध्ये विशेषता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांना अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.

तर डाळिंब बागांसह शेतीपिकांचे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. याबाबत खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासमवेत शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन द्राक्षे, डाळिंब, शेती पिकांची नुकसानीची पाहणी केली होती.

शेतकरी व सर्वपक्षीय नेते मंडळीच्या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशान्वये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या संयुक्तपणे तालुक्यातील ३५ गावातील २५० शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या १८५.२ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे, डाळिंबासह शेती पिकांचे पंचनामे केले आहेत.