अलीकडच्या काळात अनेक भागात वाहतूक कोंडी सऱ्हास पहायला मिळते. यामुळे वाहनधारकांना तसेच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सध्या इस्लामपूर शहरात देखील अशीच वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. इस्लामपूर गेल्या ३ वर्षाहून अधिक काळ पालिका प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा वचक नाही. तर वाहतूक पोलिसांचा पत्ताच नाही. त्यामुळे आठवडी बाजारात येणाऱ्या विक्रेत्यांनी मुख्य रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. त्यामुळे जीवघेणी वाहतूक कोंडी होत आहे. यावर पालिका प्रशासन मात्र शांतच आहे.
याठिकाणी नेहमीप्रमाणे वाहतूक पोलिसांचा पत्ताच नाही. त्यामुळे आठवडी बाजार शनिमंदिरापासून ते अजिंक्य बझारपर्यंत मुख्य रस्त्यावरच भरतो. रस्त्यावरील बाजारावर आणि होणाऱ्या वाहतूक कोंडीवर वेळोवेळी आवाजही उठवला आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर लोकप्रतिनिधी नाहीत. त्यामुळे पालिकेतील अधिकारी शिरजोर झाले आहेत. त्यातच वाहतूक पोलिस इतरत्र रस्त्यावर व्यस्त आहेत. त्यामुळे मुख्य भाजी मार्केटमध्ये भरलेला आठवडी बाजार आता रस्त्यावरच सुरू झाला आहे. पालिका कर्मचाऱ्यांचा यावर वचक नसल्याने भाजी विक्रेते कर्मचाऱ्याला दम भरून पुन्हा रस्त्यावरच आपला ठिय्य मांडतात. वाहतूक कोंडी डोकेदुखी बनलेली आहे. यावर आता तोडग काढण्याची गरज आहे तरच वाहतूक कोंडी सुटेल.