इस्लामपूरमध्ये महायुतीत नाराजीचा खडा! शिवसेनेला विरोध करणाऱ्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही

स्वत:च्या स्वार्थासाठी २०१९ ची विधानसभा आणि मागील लोकसभेला विरोध करणाऱ्या भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून उमेदवारी घेतली आहे.

मात्र मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला विरोध करणाऱ्या उमेदवाराचे काम न करण्याचा निर्णय जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर
केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा. धैर्यशील माने यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरवू, त्यांचा आदेश अंतिम असेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले, बऱ्याच वर्षांपासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. मात्र काल हा मतदारसंघ अजित पवार यांच्या गटाकडे गेला. भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीवर शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. आम्ही एक पक्ष, एक झेंडा आणि एकच चिन्ह जपले आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत वेगळी भूमिका घेणाऱ्या उमेदवाराचा प्रचार करणे अवघड झाले आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निशिकांत पाटील यांची भेट घेतली होती. त्यांनी धैर्यशील माने यांचे काम करण्याचा शब्द दिला होता. तरी सुध्दा निशिकांत पाटील यांनी माने यांना विरोध केला. तरीही निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी मोठ्या मनाने त्यांनी सांगितलेली कामे पूर्ण केली.