आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाची चाचणी यशस्वी

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे हातकणंगले, शिरोळ तालुका तसेच कर्नाटक मधील नागरिकांसाठी आधारवड बनत आहे. शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे ग्राम दैवत श्री माता कल्याणताई देवीच्या यात्रेच्या महाप्रसादाच्या अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. यावेळी शिवनाकवाडी येथील जवळपास आठशे जणांना विषबाधा लागण झाल्याचे समजले. यावेळी तेथील उदभवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत शिवनाकवाडी येथील नागरिकांना तातडीने उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाच्या अधिसेविका सहा अधिसेविका, परिसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली शुश्रूषा संवर्गाने आरोग्य सेवेची यंत्रणा तयार करून युद्धपातळीवर काम सुरू केले.

रुग्णालयात असणाऱ्या औषध विभागाने या रुग्णांना लागणार औषधसाठा उपलब्ध करून दिला वैद्यकीय अधिक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी याप्रसंगी महत्वाची भूमिका बजावली. शुश्रूषा संवर्गाने रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांची आरोग्य सेवा करण्याचे काम सुरू केले. यावेळी रुग्णालयातील कार्यरत असणारे सर्व स्तरावरील कर्मचारी यांनी रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. तसेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक व अधिकारी यांनी कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना दिलेली जबाबदारी त्यांनी उत्तमरीतीने पार पाडली. यावेळी इचलकरंजी परिसरातील व आजूबाजूच्या परिसरातील कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था फौंडेशन यांनी आपापल्या पद्धतीने या रुग्णालयाला विविध स्वरूपात मदत केली.

रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांनी एकसंघपणे दाखल असणाऱ्या रुग्णांची अगदी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतली. या राबवलेल्या आरोग्य यंत्रणेचे विविध स्तरावरून कौतुक केले जात आहे या घडलेल्या घटनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे, उपसंचालक डॉ. दिलिप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, उपविभागीय अधिकारी श्रीम मोशमी चौगुले, तहसीलदार सुनील शेरखाने यांनी रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली व धीर दिला.

तसेच रुग्णालयातील रुग्णांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा देण्याचे आश्वासन दिले व मार्गदर्शन केले व रुग्णांच्या सेवेसाठी हजर झालेल्या कोल्हापूर येथील व्हाईट आर्मी यांनी तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या प्रसंगी दिलेल्या आरोग्य सेवेबद्दल त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली.