वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. वेळोवेळी नागरिकांमधून मागणी देखील होते पण याकडे पशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. अपुरा पाणीपुरवठा त्यातच सतत लागणारी गळती यामुळे शहरवासियांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
इचलकरंजी शहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. दररोज ५४ एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी उपसा करूनही पाण्याचा तुटवडा भासतो. परिणामी दोन दिवसाआड मिळणारे पाणी आता चार-पाच दिवसानंतर सोडले जात आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. तत्पूर्वीच पंचगंगेचे पात्र कोरडे पडल्याचे दिसत आहे. ठिकठिकाणी पाण्याची डबकी दिसत असून पाण्याचा उग्रवास येत आहे. बंधाऱ्याकडील बाजूस गवतासह अन्य झाडे उगविल्याने येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे दिसत आहे.
शिवाय घाटावरील पायऱ्यांची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी पायऱ्यांचे दगड निखळे गेले आहेत. पात्रात पाणी नसल्याने महापालिकेने उपसा बंद केले आहे. त्यामुळे सध्या केवळ कृष्णा योजनेतूनच उपसा सुरू आहे. मात्र पूर्वानुभव पहाता या योजनेवर शहरवासियांचा भरोसा नसल्याचे दिसते. कृष्णा योजनेच्या वितरण नलिकेला कधी गळती लागेल अन कधी पाणी पुरवठा बंद होईल याचा अंदाज नाही. यामुळे शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत होताना दिसतो.
शहराला वेळेत आणि पुरेसा पाणी पुरवठा होईल यासाठी आयुक्तांपासून ते पाणी पुरवठा विभागातील अधिकारी वर्गापर्यंत कोणीच ठोस उपाय योजना करताना दिसत नाहीत. गळती लागल्यास अथवा अन्य बिघाड झाल्यास निवेदन प्रसिध्द करून गप्प बसण्यापलिकडे काहीच केले जात नाही. इचलकरंजीसाठी यापूर्वी वारणा तसेच सुळकूड अशा दोन योजना मंजूर झाल्या. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना अपयश आले.
निवडणुक आली कि विषय काढला जातो अन निवडणुक संपली की विषय बंद होतो. कोणीही यावर कोणीही शब्द काढताना दिसत नाही, हे शहरवासियांचे दुर्दैव आहे. उन्हाळ्याला आता कुठे सुरवात झाली असतानाच सध्या शहरात चार ते पाच दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो. त्यातही काही प्रभागात जाणीवपूर्वक पाच ते सहा पाणीपुरवठा केला जात नाही. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून सहनशिलता आता संपली आहे. तेव्हा याचा उद्रेक होऊ न देणे हे प्रशासनाच्या हातात आहे. यासाठी शहरातील पाणी पुरवठ्याचे गंभीरपणे नियोजन करणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर नवी योजना तातडीने राबविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.