शेतीसाठी उजनी धरणातून ४ जानेवारीला सोडलेले पाणी १५ फेब्रुवारीला बंद होणार आहे. आता धरणात एकूण पाणीसाठा १०० टीएमसी असून त्यात उपयुक्त साठा ३६.४० टीएमसीपर्यंत आहे.सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणात सध्या १०० टीएमसी पाणी असून मागील पाच-सहा वर्षांत पहिल्यांदाच फेब्रुवारीतही धरणात ३६ टीएमसीवर उपयुक्त पाणीसाठा आहे.
दरम्यान, आता सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात यापूर्वी डिसेंबरमध्ये सोडलेले पाणी संपले असून सध्या २० दिवस पुरेल इतकेच पाणी बंधाऱ्यात शिल्लक आहे. त्यामुळे फेब्रुवारीअखेर औज बंधाऱ्यात पाणी पोचेल, या नियोजनाने उजनीतून पाणी सोडावे, अशी मागणी महापालिकेने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे केली आहे. त्यासाठी साधारणत: पाच टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.
समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण व्हायला अजून एक महिना लागणार आहे. दुसरीकडे शेतीसाठी देखील मार्चमध्येच दुसरे आवर्तन प्रस्तावित असून त्याचा निर्णय आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. त्यासाठी १५ ते १८ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. आता शेतीसाठी सोडलेले पाणी शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आधार ठरला आहे. पुढे मार्चमध्ये पाणी सोडल्यावर शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या फार झळा बसणार नाहीत, हे निश्चित.
सध्या उजनीतून सोडलेले पाणी
सीना-माढा उपसा सिंचन योजना : ३२० क्युसेक
दहिगाव उपसा सिंचन योजना : १२० क्युसेक
बोगद्यातून सोडलेले पाणी : १०० क्युसेक
कालव्यामधून सोडलेले पाणी : १४०० क्युसेक
अडीच लाख हेक्टरला उजनीचा आधार
सध्या उजनी धरणातून सोडलेले पाणी थेट एक लाख ४३ हजार हेक्टरला मिळते. आता बार्शी, मंगळवेढा, शिरापूर, देगाव, एकरूख, आष्टी, सांगोला या उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्यावर आणखी एक लाख १० हजार ७४६ हेक्टरला उजनीचे पाणी मिळणार आहे. जिल्ह्यातील दहिगाव, सीना-माढा, शिरापूर, आष्टी, बार्शी, सांगोला, मंगळवेढा व एकरूख या उपसा सिंचन योजनांसाठी उजनीतील एकूण १९ टीएमसी पाणी राखीव आहे. त्यातून जिल्ह्यातील अडीच लाख हेक्टरला मोठा लाभ होणार आहे.