रस्ता रुंदीकरणाकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष, शहरवासियांमधून नाराजीचा सूर

अनेक भागात सध्या रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र दिसतच आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढच होत आहे. इचलकरंजी शहरात देखील अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.त्यामुळे त्यासाठी रस्ते व्यवस्थित करणे गरजेचे बनले आहे. इचलकरंजी शहराचा विस्तार नियोजनबध्द झालेला नाही. जागा मिळेल त्या ठिकाणी उद्योग उभा करण्याबरोबर नागरी वस्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र शहरातील अनेक रस्त्याचे रूंदीकरण न झाल्याने अनेक रस्ते धोकादायक बनले आहेत. त्यामध्ये शहराच्या मध्यवस्ती भागातील मोठे तळे ते राजवाडा चौकापर्यंतच्या रस्त्याचा  समावेश होतो.

या रस्त्यावर विद्यालय, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, न्यायालय आदि महत्त्वाची कार्यालया बरोबर लहान-मोठ्या इमारती आहेत. या रस्त्यावर २४ तास मोठी वाहतूक असते, तर शाळा, कॉलेज भरणेच्या वेळी तसेच सुटण्याच्यावेळी मोठी गर्दी होते. या रस्त्यावर आजअखेर अनेक लहान-मोठे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मोठ तळे ते नारायण टॉकीज चित्रमंदिर या रस्त्यावर सोमवारी सकाळच्या सुमारास शर्वरी सदानंद भस्मे (वय २०, रा. भोईनगर शहापूर) ही युवती महाविद्यालयातून बाहेर पडून रस्त्याकडेने जात असताना एस.टी. बसची धडक बसून जखमी झाली. या अपघाताची नोंद गावभाग पोलिसात झाली आहे.छोटे-मोठे अपघात वारंवार होत असतात. तेव्हा या रस्त्याचे रूंदीकरणाचा प्रश्न तातडीने निकाली काढावा अशी मागणी होत आहे.

शहरातील सर्वाधिक वाहतूक असलेला मोठे तळे ते राजवाडा चौकापर्यंतचा रस्ता दिवसेंदिवस वाढत्या वाहनांमुळे अरूंद होत चालला आहे. तर वाढत्या वाहनामुळे हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रश्न महानगरपालिकेच्या नगरचना विभागाच्या अंधाधुंद कारभारामुळे प्रलंबीत पडला आहे. तेव्हा आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी या रस्त्याच्या रूंदीकरणाबाबत लक्ष घालून तातडीने रस्ता रूंदीकरणाबाबत कार्यवाही करावी अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.