अलीकडे आग लागण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होतानाचे चित्र दिसत आहे. कधी उसाच्या शेतात तर कधी कारखान्याला तर कधी घराला आग लागत आहे यामध्ये खूपच नुकसान होतेच त्याचबरोबर अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागत आहे. खानापूर तालुक्यातील कारलगा येथे अशीच घटना घडली आहे. यामध्ये एका शेतकर्याचा होरपळून मृत्यू झालेला आहे. उसाला लागलेली आग विझविताना शेतकर्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना काल गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कारलगा शिवारात घडली. तुकाराम रवळू पवार (वय 75, रा.कारलगा) असे त्यांचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती, अशी पवार यांची कारलगा-चापगाव रस्त्यालगत शेती आहे. आपल्या फडातील ऊस कारखान्याला पाठवून त्यांनी नव्या लावणीसाठी थोडासा ऊस शिल्लक ठेवला होता. सध्या लावणीसाठी शेतीच्या मशागतीचे काम सुरू आहे. त्यांनी गुरुवारी उसाच्या पालापाचोळ्याला आग लावली होती.
मात्र, ही आग अचानक उसालाही लागली. ती विझविण्याच्या प्रयत्नात ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यांचा होरपळून मृत्यू झाला. आजुबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना बाजूला काढले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.