सध्या प्रत्येक मतदारसंघाचे विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलेले आहे. अनेकांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छा देखील व्यक्त केलेली आहे. अनेक मतदारसंघात चुरशीची लढत होणार असे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत अशातच सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीनी रंगतदार तालीम सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.
त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय सत्तासंपयांत कोण बाजी मारणार, याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर आणि विनिंग मेरीटच्या निकषावर शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या दहा जागांमध्ये माझे नाव असल्याचा दावा करत महायुतीची उमेदवारी मलाच मिळणार, असे छातीठोकपणे सांगत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
तर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हेदेखील इच्छुक आहेत. आमदार राष्ट्रवादीचाच असा निर्धार करत मतदारसंघासह जिल्ह्यात रान सारवलेले आहे. राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाची मजबूत केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक विकासकामे आणून उमेदवारीवर दावा केला आहे. तर भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
पडळकर बंधूनी खानापूर विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले असून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमदार पडळकरांनी थोरले बंधू ब्रम्हानंद पडळकर यांचे जोरदार लॉन्चिंग करून खानापूरच्या विधानसभेच्या मैदानात उतरविण्यासाठी ताकदीने यंत्रणा लावली आहे. त्यामुळे बाबर , पाटील आणि पडळकर गटाचे कार्यकर्ते आता जोमाने, विधानसभेच्या तयारीला लागले आहेत.