टोपमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वानराला पकडले, नागरिकांतून समाधान व्यक्त

अनेक भागात सध्या वानरांनी धुमाकूळ घातल्याचे चित्र दिसतच आहे त्याचबरोबर या वानरांपासून नागरिकांना त्रास देखील सहन करावा लागत आहे. हातकणंगले तालुक्यातील टोप येथे गेल्या काही दिवसांपासून मध्यवस्तीत रासाई मेडिकल, भगवा चौक, विठ्ठल मंदिर, माळवाडी भागात एका वानराने धुमाकूळ घातला होता. अनेक नागरिक मर्कटलीलांनी त्रस्त झाले होते. अचानक घरांच्या छतावरून उड्या मारत हे वानर अचानक रस्त्यावर येते होते. तसेच महिला व लहान मुलांवर हल्ला करून जखमी केले होते. याबाबत वनविभागाने या वानराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत होती अखेर एक आठवड्याच्या प्रयत्नानंतर आज त्या वानरास भगवा चौक परिसरात पकडण्यात यश आले.

यानंतर त्यास सुरक्षितरित्या जंगल अधिवासात सोडण्यात आले. टोप येथे कासारवाडीकडून येणारा व नागावच्या दिशेने जाणार मोठा ओढा आहे. या ओढ्याच्या दोन्ही बाजूला झाडाच्या आश्रयाने वानराच्या टोळ्या कायमस्वरूपी वास्तव्यास असतात. या टोळीतील एका वानराने गेल्या काही दिवसांपासून गावात उच्छाद मांडला आहे. या वानराची चाहूल लागताच मुले, महिला भयभीत होत होते पण आता या वानराला पकडल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
या कारवाईत करवीर वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव पथक, कोल्हापूर याच्या वतीने अमोल चव्हाण, प्रदीप सुतार, अशितोष सुर्यवंशी, मतीन बांगी यांनी पकडण्यास मदत केली.