ग्रामस्वच्छता अभियानात बोरगाव, धामणीला विभागून दुसरा क्रमांक

सध्या गावोगावी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. तसेच या अभियानाअंतर्गत स्पर्धा देखील घेण्यात येतात आणि नंबर काढले जातात. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम जिल्हास्तरीय स्पर्धा सन २०२३-२४ मध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील पिंपळवाडीने पहिले स्थान पटकावले. तासगाव तालुक्यातील धामणी व वाळवा तालुक्यातील बोरगाव यांना विभागून द्वितीय, तर कापरी (ता. शिराळा) यांना विभागून तृतीय क्रमांक मिळविला.

याशिवाय तीन ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत २०२३-२४ मध्ये ग्रामस्पर्धा घेण्यात आल्या होत्या. जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या ६० मतदार संघातील प्रथम आलेल्या ६० ग्रामपंचायतींपैकी गुणानुक्रमे पहिल्या ९ ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आली होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने या गावांची तपासणी केली होती. त्यानंतर आज जिल्हास्तरीय निकालाची घोषणा करण्यात आली. पुरस्कारप्राप्त गावांचा लवकरच सन्मान करण्यात येणार आहे.

खानापूर तालुक्यातील बाणूरगडला घनकचरा, सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापनाबद्दल वसंतराव नाईक या विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच मळणगावला (ता. कवठेमहांकाळ) पाणी गुणवत्ता व व्यवस्थापनाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पलूस तालुक्यातील घोगावला स्वच्छतागृह व्यवस्थापनाबद्दल आबासाहेब खेडकर या विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.