लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक आश्वासने देण्यात आली. पण अनेक भागात याची पूर्तता न झाल्याने नागरिकांमधून नाराजी देखील व्यक्त होत असतानाचे चित्र पहायला मिळत आहे. विधानसभेच्या तोंडावर शासनाने एमआयडीसीला तत्त्वता मंजुरी दिली. केवळ जमिनीची पाहणी करण्या व्यतिरिक्त पुढे कोणतीच कार्यवाही केली नाही. आष्टा एमआयडीसीच्या कामाला गती मिळावी, लवकरात लवकर कार्यवाही व्हावी व हा प्रश्न मार्गी लागावा याबाबतचे निवेदन कै. बापूसो शिंदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना देण्यात आले.
येथील न्यू प्राइड उद्योजकांच्या कार्यक्रमानंतर त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. पण सविस्तर चर्चा न होऊ शकल्यामुळे पुन्हा शासकीय विश्रामगृह येथे त्यांची भेट घेऊन चर्चा केली. आष्टा एमआयडीसीसाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी डी. एस. कोळी, श्रीराम ढोले, व कै. बापूसो शिंदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संग्राम शिंदे, शहाजान जमादार उपस्थित होते.