आष्ट्यात प्रधानमंत्री आवास योजना कक्ष सुरू

 आष्टा पालिकेत प्रधानमंत्री आवास योजना कक्ष सुरू करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीर कुदळे यांनी केले. आष्टा शहरातील स्वत:ची जागा नसणाऱ्या, भाड्याच्या घरात  झोपडपट्टीत राहणाऱ्या शेतमजूर, निराधार तसेच बेघर बांधकाम कामगारांना नगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आरक्षित सर्वे क्रं. ३६८ मधील सहा एकर भूखंडावर भागीदारी तत्वावर परवडणाऱ्या घराच्या (एएचपी) निर्मिती अंतर्गत घरकुले बांधून मिळावीत म्हणून शिवसेनेचे वीर कुदळे यांनी बेमुदत आमरण उपोषण केले होते. खा. धैर्यशिल माने, पालिकेचे मुख्याधिकारी अवधुत कुंभार, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, तालुका प्रमुख सागर मलगुंडे यांच्या यशस्वी शिष्टाईने हे आंदोलन यशस्वी झाले.

त्यानुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल तीन लाखापर्यंतचा तहसील उत्पन्न दाखला, स्वत:ची जागा नसणाऱ्या कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड, रेशनकार्ड, अन्यत्र कोठेही घर नसल्याचे तहसिलदारांच्या पुढे प्रतिज्ञापत्र, राष्ट्रीयकृत अथवा कोणत्याही बँकेचे पासबुक, फोटो आदी कागदपत्रासहित महा ई सेवा केंद्र, अथवा नगरपालिका प्रधानमंत्री आवास योजना कक्षात ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज दाखल करावयाचे असुन रोख पैसे देऊन स्वतंत्र अर्ज विकत घेण्याची गरज नाही. तसेच यापूर्वी अर्ज दिलेल्या अर्जाची छाननी करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असुन संबंधीत बेघर अर्जदारांनी पालिकेतील प्रधानमंत्री आवास योजना कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. प्रधानमंत्री आवास योजना कक्षाच्या शुभारंभास नगरसेवक वीर कुदळे, भाजपा मंडलाध्यक्ष अमोल पडळकर, शहरप्रमुख राकेश आटुगडे, प्रधानमंत्री कक्ष समन्वयक प्रतापसिंह तांबवेकर, विद्युत अभियंता अनिकेत हेदें, शिरिष काळे, सौ. लता पडळकर, सौ. अर्चना माळी व लाभार्थी उपस्थित होते.